Thursday, October 18, 2007

जय माता दी..! (वैष्णोदेवी)

' प्यार से बोलो जय माती दी... ' म्हणत डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली की आश्चर्य वाटतं. वैष्णोदेवीच्या डोंगराची चढण चढण्यासाठी अवघड खरी पण मनात अपार श्रद्धा असलेले जगभरातील कानाकोपऱ्यातून भाविक आनंदात मातेच्या दर्शनासाठी जातात.

जम्मू-काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात कटरा नावाचं गाव आहे. तिथून जवळच असलेल्या त्रिकूट डोंगरावर वैष्णोदेवीचं स्थान आहे. तीन देवींच्या शक्तींचं रूप म्हणून वैष्णोदेवीचं आराधना केली जाते. डोंगरावर चढून जाणं मोठं अवघड काम आहे. सुमारे बारा ते पंधरा किमी अंतराचा चढ चढून जातात. काही जण घोड्यावरूनही यात्रा करतात. या यात्रेला ' माता का बुलावा ' असं म्हटलं जातं. एकदा का ही यात्रा पूर्ण केली तर मातेचा आशीर्वाद कायमचा तुमच्याबरोबर राहतो , अशी श्रद्धा आहे. माता वैष्णोदेवी वसलेल्या त्रिकूट पर्वताचा उल्लेख ऋग्वेदात आणि महाभारतातही आहे. माता वैष्णोदेवी ज्या गुहेत वसली आहे , ती हजारो वर्षांपूवीर्ची असावी , असं मत भूगोलतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

वैष्णोदेवीच्या या स्थानाविषयीची एक कथा सांगितली जाते. असुरांचा विध्वंस करत असताना माता महाकाली , महालक्ष्मी आणि महासरस्वती एकेदिवशी एकत्र आल्या. त्यांनी आपलं तेज आणि शक्ती एकत्र करून एका रूपवान मुलीची निमिर्ती केली. मुलीने विचारलं , माझी निमिर्ती तुम्ही कशासाठी केलीत. तेव्हा , पृथ्वीवर जाऊन तिथे सर्वांना सुखसमाधान आणि न्याय मिळवून देण्यासाठी तुझी निमिर्ती केली आहे.

भारतातल्या दक्षिणेत राहणारा आमचे भक्त रत्नाकर आणि तुझी पत्नी यांच्या घरी तुझा जन्म होणार आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी तुझ्या आध्यात्मिक बळाचा वापर कर. तुला आवश्यक शक्ती प्राप्त होताच तू विष्णूमध्ये विलीन होशील , असं देवींनी तिला सांगितलं.

काही काळानंतर रत्नाकर आणि त्याच्या पत्नीला संुदर कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव वैष्णवी ठेवलं. अगदी लहानपणापासूनच तिला अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा होती. तिला शिकवणाऱ्या शिक्षकांचं ज्ञानही तिच्यासमोर अपुरं पडत होतं.

ज्ञानप्राप्तीसाठी तिने तपस्येचा मार्ग पत्करला. ती घनदाट जंगलात पोहोचली. त्याच दरम्यान श्रीराम वनवासासाठी जंगलात आले. तेव्हा श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत , हे ओळखून तिने त्यांना मला आपल्यात सामावून घ्या , जेणेकरून ती सर्वाेच्च शक्तीचा एक भाग बनूशकेल , अशी इच्छा प्रकट केली. पण श्रीरामाने ही योग्य वेळ नाही , वनवास संपताच पुन्हा भेटीचं वचन दिलं. तिने त्यांना ओळखलं तर ते इच्छा अवश्य पूर्ण करतील , असं सांगितलं.

रामाने आपलं वचन पाळलं आणि रावणाबरोबरच युद्ध संपताच ते परतले ते एका वृद्धाच्या वेषात. त्यावेळी वैष्णवीने त्यांना ओळखलं नाही. याचाच अर्थात सवोर्च्च शक्तीपैकी एक होण्याची वेळ अजून आली नाही असं सांगून रामाने कलियुगात भेटू असं सांगितलं. काल्कीच्या रूपात रामाने अवतार घेतल्यावर ही भेट होणार होती. पण त्यासाठी त्रिकूट डोंगरावर आश्रम उभारून ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वैष्णवीने ध्यानाला प्रारंभ केला. वैष्णवीच्या तपस्येची माहिती अनेकांना समजली. तांत्रिक गोरखनाथाने तिची परीक्षा पाहायचं ठरवलं. त्यासाठी शिष्य भैरवनाथाला पाठवलं. भैरवनाथाने आश्रमाजवळ पाळत ठेवली.

त्यावेळी तपस्या करणारी वैष्णवी नेहमी आपल्याजवळ धनुष्यबाण बाळगत असल्याचं दिसलं. आणि तिच्या आसपास नेहमी माकडं आणि हिंस्त्र सिंह वावरत असल्याचं पाहिलं. मात्र तिच्या रूपाने त्याच्यावर मोहिनी घातली. त्याने तिच्याशी विवाह करायचं मनोमन ठरवून टाकलं. त्याचवेळी वैष्णवीच्या भक्तापैकी माता श्रीधरने भंडाऱ्याचं आयोजन केलं. त्यात सर्व ग्रामस्थ आणि गोरखनाथ यांनाही निमंत्रण देण्यात आलं. त्यावेळी भैरवनाथाने वैष्णवीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला , पण वैष्णवीने स्वत:ला सोडवून पुन्हा डोंगरात तपस्येला प्रारंभ केला. भैरवनाथ मात्र वैष्णवीला मिळवण्यासाठी तिचा पाठलाग करू लागला. भैरवनाथच्या सततच्या पाठलागामुळे देवींनी त्याला ठार करायंच ठरवलं.

वैष्णवी जिथे ध्यान करत होती तिथल्याच टेकडीवर देवींनी भैरवनाथाचं मस्तक छाटलं. मात्र त्याच वेळी भैरवनाथच्या येण्याचं मूळ उद्देश लक्षात आल्याने त्याला माफ केलं. त्यामुळेच वैष्णोदेवीला आलेल्यांची यात्रा भैरवनाथच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. हे समजताच वैष्णवीने आपलं मानवी रूप सोडून तपस्या करण्याचं ठरवलं त्यामुळे त्या ठिकाणी साडेपाच फूटाच्या तीन पिंडी तयार झाल्या. त्यालाच आज श्री माता वैष्णोदेवी जी म्हटलं जातं.

No comments: