Wednesday, October 17, 2007

आदिमाता 'जीवदानी'

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर निघून जायची. त्या गायीबद्दल शेतकऱ्याच्या मनात कुतूहल जागं झालं. एकदा त्याने तिचा पाठलाग केला. डोंगरावरच्या एका मैदानात ती गाय थांबली आणि त्याचक्षणी तिथे एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती गाईची मालकीण असावी असं समजून शेतकऱ्यांने तिच्याकडे , आपल्या शेतात गाय चरते म्हणून पैशांची मागणी केली.

ती स्त्रीने शेतकऱ्याच्या हातावर पैसे ठेवत असतानाच शेतकऱ्यांने आपण अस्पृश्य असल्याचं सांगितलं. मला स्पर्श करू नकोस अशी विनंती त्याने करताक्षणीच ती तेजस्वी स्त्री नाहीशी झाली. शेतकरी अवाक् होऊन हे सर्व पाहत असतानाच त्याला दुसरा धक्का बसला. त्या गाईने मोठा हंबरडा फोडून कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं. गाईच्या बलिदानाचं रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र गाईने जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला ' जीवदानीचा डोंगर ' आणि डोंगरावर वास्तव करणारी आदिमाता ' जीवदानी ' म्हणून प्रसिद्ध झाली.

गाईने जिथून उडी घेतली तिथे एक ' तांदळा ' ( अष्टविनायकाच्या स्वरूपातलं मूतीर्चं रूप) ठेवला होता. भाविक त्याचीच पूजा करत. पूर्वी गुराखीच शिळेची पूजा करत. त्यानंतर बारकीबाय नावाची भक्त तिथे पूजा करू लागली. १९५६ मध्ये भक्तांनी देवीच्या मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा केली. २३ फेब्रुवारी १९५६ रोजी बारकीबायच्या पुढाकाराने ट्रस्टची स्थापना झाली.

जीवदानीच्या पायथ्याशीच गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार नयनरम्य वनराईतून गडावर चढायला सुरुवात केल्यानंतर थकवा जाणवतच नाही. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करून तिथे देवीची मूतीर् बसवण्यात आली आहे. उजव्या हाताने भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या देवीचं दर्शन होताच भाविकांचा थकवा दूर होतो. मंदिराच्या परिसरात अनेक गुंफा असून त्या पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. त्याच्या शेजारीच मानकुंड नावाची पाण्याची कुंडं आहेत. डोंगरावरून विरार आणि परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. डोंगरावरून खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहिण बारोंडा देवीचं तसंच महादेवाचं मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते.

जीवदानीचा डोंगरावर १७ व्या शतकात जीवधन नावाचा गडकोट किल्ला होता. तटाचे काही कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात. मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने हल्ला केला होता. त्यावेळी गडावर फक्त शंभर मराठे होते. म्हणून मराठे किल्ला सोडून पळून गेले. त्यानंतर चिमाजीअप्पांनी आदेश दिल्यावर बरवाजी ताकपीर याने तीनशे सैनिकांसह हल्ला करून जीवधन गड ३१ मार्च १७३९ रोजी सर केला. टेहळणीसाठी मोक्याची जागा म्हणून किल्ल्याला महत्व होतं. पण किल्ला उपेक्षित राहिल्याने त्याचं अस्तित्वच संपुष्टात आलं.

मात्र जीवदानी देवीमुळे या परिसराला तीर्थस्थानाचा दर्जा मिळाला आहे. सध्या जीवदानी देवीची महती वाढल्याने इथे दरदिवशी हजारो भाविक गदीर् करतात. मंगळवार , शुक्रवारी इथे बरीच गदीर् होते. नवरात्रीचे नऊ दिवस गडावर उत्सव असतो. दसऱ्याच्या दिवशी तर एक लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला अभिषेक , महावस्त्रालंकार परिधान केल्यानंतर घटस्थापना केली जाते. दुर्गाष्टमीला विविध पूजा केल्या जातात. विजयादशमीला महाभिषेक केला जातो. भाविकांच्या वाढत्या संख्येला आवश्यकतेनुसार मंदिराचा जीणोर्द्धार करून त्याचं विशाल मंदिरात रूपांतर करण्यात आलं आहे.

मंदिराच्या सभागृहाच्या नव्वद फूट खाली असलेल्या पठारावर सात मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासमोर पाच हजार फुटांचं सभागृह तयार झालं आहे. पायथ्यापासून गडावर चढण्यासाठी प्रशस्त पायऱ्या असून भाविकांना ऊनपावसांचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्यांचं छत उभारण्यात आलं आहे. आता फनिक्युलर रोप रेलचा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांसारख्या डब्यात बसून गडावर जाण्याची व्यवस्था होईल.

- शशी करपे

No comments: