Monday, October 15, 2007

वणीची सप्तश्रृंगी

नाशिकच्या उत्तरेला प्रवास सुु केला की अनोख्या आकाराच्या डोंगरांची रांग लक्ष वेधून घेते. या डोंगररांगेतच एका गडावर एका प्रचंड दगडी गुहेत सप्तशृंगीचं स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्ध पीठ. दक्षप्रजापतीने केलेल्या अपमानामुळे सतीने यज्ञकुंडात प्रवेश केला. तिचं शरीर खांद्यावर घेऊन क्रोधाने बेभान होऊन फिरणाऱ्या शिवाला रोखण्यासाठी, विष्णूने सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. तिचे अवयव ज्या एकावन्न ठिकाणी गळून पडले ती शक्तिपीठं बनली, अशी कथा पुराणात आहे.

सप्तशृंगीच्या गडाच्या पायथ्याचं गाव नांदुरी. इथून घाटरस्ता सुरू होतो. दहा किलोमीटर अंतर पार केलं की आपण पठारावर येऊन पोहोचतो. समुदसपाटीपासून ४७०० फूटांवर हे साडेनऊ हेक्टरचं गावठाण आहे. पठारावर गेल्यावर समोर अंगावर येणारा सरळसोट कडा दिसतो. त्या पार्श्वभूमीवरचं शुभ्र मंदिर लक्ष वेधून घेतं. वर जाण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. संपूर्ण मार्गावर छप्पर घातलंय. पाचशे पायऱ्या चढून गेल्यावर सुरेख बांधणीचं मंदिर आहे. मूळ पायऱ्यांचं बांधकाम कान्हेरे बंधू आणि पेशवेकालीन सरदार दाभाडे यांची पत्नी उमाबाईने यांनी केल्याच्या नोंदी आहेत. देवीची मूतीर् पूर्वाभिमुख भव्य आणि आणि अतिशय रेखीव आहे. आठ ते दहा फूट उंच, अष्टभूजायुक्त मूतीर्ची पूजा शिडीवर चढून करावी लागते.

नवरात्र उत्सवात प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर सकाळी महापूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम होतो. नवमीच्या दिवशी शतचंडी याग केला जातो. मंदिराच्या मागे असलेल्या गुहेच्या माथ्यावर एक ३०० मीटर दुर्गम सुळका आहे. त्यावर निशाण चढवणं हा देवीच्या यात्रेतला हा नवरात्रीतला महत्त्वाचा कार्यक्रम असतो. याला पाचशे वर्षांची परंपरा आहे. नवरात्र संपल्यावर कोजागिरी पौणिर्मेला ५० ते ६० हजार भाविक गडावर येतात. अमरकंटकहून नर्मदा, उज्जैनहून क्षीप्रा, सुरतहून तापी, भीमाशंकरहून भीमा अशा देशभरातील नद्यांचं पाणी कावडीमधून घेऊन पायी प्रवास करत भाविक गडावर येतात. या पाण्याने देवीला अभिषेक घातला जातो. गेले पन्नास वर्षं ही परंपरा सुरू आहे.

नवरात्रीच्या उत्सवासाठी गडावर १४ ते १५ लाख भाविक येतात. वर अत्यंत कमी जागा असल्याने या गदीर्चं नियोजन करणं कौशल्याचं असतं. यात्रेत दुर्घटना होऊ नये म्हणून व्यवस्थापनाने अडीचशे सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. यावेळी अनेक जण संपूर्ण गडाची प्रदक्षिणा करतात. यावषीर् हा प्रदक्षिणेचा मार्ग काँक्रिटचा केला आहे . भक्तनिवासाच्या दोनशे खोल्यांमधून दोन हजार लोकांची सोय होऊ शकते. याशिवाय पाच हजार लोक बाहेर तंबू ठोकून राहतात. यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला महाप्रसाद म्हणून जेवण देण्याचा उपक्रम यावषीर् राबवला जाणार आहे. नांदुरीवरून येणाऱ्या मार्गाचं रुंदीकरण करण्यात आलंय. यात्रेच्या काळात केवळ एसटी बसेस आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहनं वर येऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिकपासून ६५ किलोमिटरवर असलेलं हे तीर्थस्थान दिवसेंदिवस त्र्यंबकेश्वर, शिडीर्इतकंच भाविकांच्या आकर्षणाचं केंद बनत चाललं आहे.

- प्रगती बाणखेले

No comments: