Sunday, October 14, 2007

मातेची हुरहूर लावणारं माहूर

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकामातेचा नवरात्र महोत्सव हा भक्तांच्या गर्दीचा कालखंड असतो . माहूरची रेणुका मराठवाडा , विदर्भ , वऱ्हाड , खानदेश तसेच आंध्र प्रदेशातल्या अनेकांचे कुलदैवत आहे . चांदसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सीकेपी मंडळीही तिला कुलदेवतेचे स्थान देतात . त्यामुळे पितृपंधरवड्यात शुकशुकाट असलेल्या माहूरगडावर नवरात्रात कुलाचारांसाठी भक्तांची प्रचंड गदीर् उसळते .

प्राचीन काळी माहूरचे जंगल ' अमलीवन ' म्हणून प्रसिद्ध होते . या परिसरात रेणुकामाता , दत्तात्रेय , अनसूयामाता या तीन डोंगरावर असलेल्या मंदिरांना जोडणारा माहूरचा डोंगरकिल्ला एकेकाळी सत्तेचे केंद होता . एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू , सहा मैलाचा परिसर व्यापणारी तटबंदी आज मात्र उपेक्षित राहिली आहे . आजही ' हत्तीदरवाजा ', किल्ल्यावरचे प्रचंड तळे ( ब्रह्माकुंड ), कारंजी , हौद यांचे अवशेष असलेला ' चिनी महाल ' मध्ययुगीन वैभवाची साक्ष देतो .

१४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा या परिसरातली मंदिरे , तीर्थस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली होती . पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .

या सभामंडपवजा मंदिरात ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे . देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे . प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे . अलीकडे दर्शनाच्या सोयीसाठी या वास्तूत काही बदल करण्यात आले आहेत . या सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूतीर् आहेत .

खालच्या बाजूला परशुराम मंदिर , दर्शनी भागात गणपती मंदिर , विष्णूकवींचा जीणोर्द्धारीत मठ , पांडवतीर्थ , औदंुबर झरा , अमृतकुंड , आत्मबोधतीर्थ , मातृतीर्थ , रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही धामिर्क स्थळे आहेत . प्रत्येकाची स्वतंत्र दंतकथा आहे .

इतर शक्तीपीठात देवीच्या मूतीर् असताना माहूरला रेणुकामातेचा तांदळा का पूजला जातो याच्या अनेक पुराणकथा व दंतकथा प्रचलित आहेत . त्यापैकी एका कथेनुसार ; माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले . शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला . ऋषीकडे कामधेनू कशाला हवी ? ती माझ्यासारख्या पराक्रमी राजाकडेच अधिक शोभून दिसेल , असे सांगत त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला . आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली . नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला . तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो दु : खी होऊन शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल . फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले . मातेची हुरहूर लावते ते माहूर !

एक निसर्गरम्य ठिकाण म्हणूनही माहूरला महत्त्व आहे . उभ्या चढाचे अवघड घाट , वनराईने नटलेल्या दऱ्या , वनश्रीने नटलेले डोंगर , हरणांचे कळप , मोरांचे थवे , वानरांचे काफिले असे संपन्न प्राणीजीवन असलेल्या माहूर परिसरात उनकेश्वर इथले गरम पाण्याचे , त्वचारोग घालवणारे झरे तसंच सहस्त्रकुंड इथले नयनरम्य धबधबे हेही पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत . तसेच देवदेवेसरी , शेख फरीद दर्गा , वस्तुसंग्रहालय इथेही भक्तांची गदीर् होते .

- सु . मा . कुलकणीर्

No comments: