Thursday, September 6, 2007

श्रावणातील उपवास

[ Thursday, September 06, 2007 02:38:32 am]

- वैद्य कृ. के. कानिटकर
उपवासाची गरज चातुर्मासातील श्रावणातच का, असा प्रश्न बरेचदा उपस्थित केला जातो. गरज आहे ती शरीराच्या स्वास्थ रक्षणासाठी आणि आरोग्यासाठी. कारण या काळातील हवामानामुळे आहार-विहारात जो बदल होतो त्यामुळे आषाढ-श्रावण महिन्यात वायूचे अनंत दोष प्रकृतीत निर्माण होतात. मुख्यत: पचन संस्थेत फार मोठा फरक म्हणजे अरुची, भूक न लागणं, मल प्रवृतीची तक्रार आणि शरीराच्या विविध भागांमध्ये वेदनांचा उद्भव होणं इत्यादी प्रकार दिसून येतात. श्रावण महिन्यापूवीर्च्या आषाढ महिन्यात दोन एकादश्या, स्त्रियांचे गोपद्मव्रत, गुरुपौणिर्मा व्रत, गुरूपूजन यामुळे कृतज्ञता येते. हे सण, व्रत-वैकल्य उपवासाच्या मूळ अर्थाशी जोडूनच येतात. उपवासाच्या दिवशी दुपारी एकदा उपवासाचे पदार्थ आणि मध्ये एकदा पाणी पिऊन रात्री सूर्यास्तानंतर भोजन घ्यावं. यामुळे अग्नि प्रदीप होऊन उत्साह वाढतो असा उपवासाचा अर्थ अभिप्रेत आहे.

श्रावणातील उपवास आणि व्रत-वैकल्य यांची सांगड घालण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ उपास करणं अभिप्रेत नसून त्याबरोबरीने पूजा-अर्चा, व्रत-वैकल्य करणंही गरजेचं आहे. कारण चातुर्मासातील उपवास हे याच सणावारांच्या निमित्ताने केले जातात. श्रावणातील प्रत्येक सणावारांमागे निश्चित असा उद्देश आहे. गणेशाचं दुर्वा, बेल, आघाडा, शमी, मंदार इत्यादी फुलांनी पूजन करावं असाही आध्यात्मिक ग्रंथात उल्लेख आढळतो. वनस्पती पूजनाच्या मागे आरोग्याचं रक्षण हा हेतू आहे. मांगल्यामुळे संयम निर्माण होतो हे पंचामहाभूत तत्त्व आहे. त्यापासूनच सर्वार्थ जीवन सुरू राहतं आणि म्हणूनच उपवासाचं महत्त्व आहे. इथेही हाच संयम आवश्यक आहे. खाण्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने करण्यात येणारा तो एक प्रयोग आहे. मात्र 'एकादशी आणि दुप्पट खाशी, तरी म्हणे मी उपाशी' असं होता कामा नये. तसं झाल्यास उपवासाचा काहीही फायदा होत नाही.

बरेच वेळा उपवासाच्या दिवशी उपवासाच्या पदार्थांवर ताव मारला जातो पण असं केल्याने अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाहीत. उलट पोट बिघडण्याची शक्यता वाढते. पथ्य असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करण्यापूवीर् एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरशी बोलून आहार ठरवून घ्यावा. अजिबातच उपवास न करण्याने जसा पचन संस्कृतीवर ताण पडू शकतो. तसंच अति उपास केल्यानेही प्रकृतीस त्रास होऊ शकतो. आठवड्यातून दोन पेक्षा अधिक उपवास नसावेत. बऱ्याच जणी आठवड्यातून तीन-चार उपवास करतात त्याचाही त्रास होऊ शकतो. फार काळ उपाशी राहिल्याने आम्लपित्त उफाळू शकतं. उपवासाच्या काळातही फळांचा रस किंवा फळांचं सेवन करावं त्यामुळे पित्त भडकत नाही.

श्रावण वद्य पक्षातील चतुथीर्ला संकष्ट चतुथीर्च्या उपासाला प्रारंभ करावा असं चातुर्मासात म्हटलं आहे. मात्र उपवासाच्या दिवशी खूप तेलकट पदार्थ खाऊ नयेत.

पाप कर्माच्या निवृत्तीसाठी पूजा, प्रार्थना, ब्रह्माचर्य, संयम यांच्या गुणांच्या सहवासामुळे मिळणाऱ्या फायद्यासाठी केवळ शरीर शोषणासाठी नव्हे तर रोगी लोकांच्या रोग मुक्ततेसाठी ज्याच्या योगाने सिद्धित्वासाठी हे उपोषण हे संयम आवश्यक आहे.

इष्ट देवतेच्या सान्निध्यात राहून जप-तप-पूजा सात्त्विक भावाने आणि अल्प आहार घेऊन करणं म्हणजे उपवास असं आयुवेर्दाच्या आद्य तपस्याने आपल्या चरक ग्रंथात लिहून ठेवलं आहे. म्हणूनच चातुर्मासात सण, व्रत-वैकल्य, उपवास पाळायचे असतात.

No comments: