Monday, August 20, 2007

कौपिनेश्वर मंदिर

- श्री. वा. नेलेर्कर
भारतात महादेवाची अनेक मंदिरं आहेत. त्यातली अनेक प्राचीन आहेत. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर सुमारे अडीचशे वर्षं जुनं आहे. या नात्याने शहराचा पुराण पुरुष वा ग्रामदेवता म्हणून परिचित आहे. ठाण्याचे पंचागकतेर् दा. कृ. सोमण यांनी कौपिन शब्दाचा अर्थ जीर्ण वस्त्र, लंगोटी आणि पाप असल्याचं सांगितलं.

शंकर हा देव विरक्त मानला जातो. गरिबांचा देव या दृष्टीने कौपिन शब्दाचा अर्थ अगदी चपखल म्हणावा लागेल. इ. स. १७६०च्या सुमारास सर सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी हे मंदिर बांधलं. मासंुदा तलावाच्या पूवेर्ला अगदी काठावर हे मंदिर जुन्या काळी उभे होते. सध्याचा शिवाजी पथ त्या काळी नव्हता. मासुंदा तलाव हे ठाण्याचं भूषण समजलं जातं. पण तलावाचं लहान स्वरूप आपाल्याला दिसतं. पण चौतीस एकर भूभाग या तलावाने व्यापला होता, अशी माहिती मंुबई गॅझेटियरमध्ये उपलब्ध आहे. त्या भोवतालचा परिसर अंदाजे दोनशे वार लांब आणि साठ वार रूंद असा होता. हा सगळा भूभाग श्री. कौपिनेश्वर मंदिर देवस्थान म्हणून ओळखला जात असे. विशेष म्हणजे मंदिरात सुप्रतिष्ठित शिवलिंग या महादेवाची पिंड मासुंदा तलावात सापडलेली आहे, हे कदाचित आजच्या पिढीला माहीत नसेल म्हणून तलावाच्या काठावर मंदिर उभारून त्यामध्ये मूतीर्ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरातील महादेवाची पिंड भव्य आहे. प्रमुख मंदिराच्या पिछाडीस पिंपळाचं झाड होतं, मोठा पारही होता. त्या पारावर मारुतीची दगडी मूतीर् होती. काळाच्या ओघात तिथलं पिंपळाचं झाड आणि पार लुप्त झालाय . मारुतीची मूतीर् मंदिराच्या आवारात उत्तरेकडील कोनाड्यात स्थापित केली आहे. मंदिराच्या पिछाडीस उत्तरेश्वराचं छोटेखानी मंदिर होते. सध्या ही मूतीर् सीमलादेवीच्या पलीकडच्या मंदिरात विराजमान आहे.

या मंदिरातील शिवलिंगाची मूतीर् सुमारे चार फूट तीन इंच आहे. शिवलिंगासमोरील आवारातील दगडी नंदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे. एका चौथऱ्यावर नंदीची स्थापना करण्यात आली आहे. नंदीपासून महादेवाची मूतीर् सुमारे सत्तर फूट अंतरावर आहे. गर्भगृह चौकोनी असून ते प्रशस्त आहे. वीस फूट उंचीच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे.

मंदिराच्या आवारात अन्य अनेक मंदिर आहेत. राम, मारुती, गुरुदेव दत्त, कालिका माता, शीतला देवी आदी अनेक देवांचा त्यात समावेश आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनाला येतात. महाशिवरात्रीला तर भाविकांचा गदीर्चा उच्चांक घडतो. दोन लाखांवर भाविक दर्शन घेतात. किर्तन, प्रवचन, हरीपाठ, उत्सव या मंदिरात नित्य सुरू असतात.

१९७७मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ज्ञानकेंद वाचनालयाची वाटचाल इथे चांगल्या प्रकारे सुरू आहे. वाचक वर्गाची संख्या हजारावर आहे. मराठी, संस्कृत, गुजराथी आणि हिंदी भाषेतील ग्रंथाचा संग्रह या वाचनालयात आहे.

कौपिनेश्वर सांस्कृतिक समितीतफेर् गेली सहा वर्षं गुढीपाडव्याला निघणारी नववर्षं स्वागतयात्रा ही ठाणे शहराची भूषण आहे.

No comments: