Monday, August 20, 2007

साठा उत्तरांची कहाणी संपूर्ण की अधुरी....

- विभावरी दामले
श्रावणातल्याच काय, इतरही अनेक व्रतांच्या कहाण्या म्हणजे लोककथांचं मोठं दालन आहे. तत्कालीन बायकांचं जगणं अधोरेखित करणाऱ्या या कहाण्यांमधून आज काय आणि किती घ्यायचं, हे शेवटी ज्याने त्याने ठरवायचं...

....................

निर्मळ मळे, उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे... ही कहाणी मी कधीपासूनच ऐकत्येय . कदाचित गर्भात असल्यापासून. बाळपणापासून अगदी नित्यनेमानं ऐकत्येय. कहाणीतल्या लयीनं मी आनंदी व्हायचे आणि सोवळ्यातल्या आजीच्या मांडीवर जागत बसायचे. 'ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी' अशी गणपतीला त्याचीच कहाणी ऐकवायच्या कल्पनेची मौज वाटायची.

पुढे स्वत: वाचू लागले. श्रावणमहिन्यातल्या कहाण्या सर्वात जास्त म्हणून श्रावण हा महिन्यांचा राजा ही ठाम समजूत होती. श्रावण सोमवारच्या पाच कहाण्या आणि श्रावण शनिवारच्या चार म्हणून त्यांच्यात खरी लढत आहे, असं वाटायचं. तसंच श्रावण सोमवारचा उपास आणि शनिवारचा उपास सर्वांनाच घताला जात असे त्यामुळे मोठ्या माणसांना पण आमच्यासारखंच वाटत असणार याची ठामच खात्री होती.



अनेक शब्दांचे अर्थ न समजतासुद्धा कहाण्या ऐकणं हा एक सुरसरम्य प्रकार होता. प्रत्येक कहाणीला एक लय आहे, एक नाद आहे. कहाणी वाचणारी व्यक्तीपण आवाजाच्या एका खास शैलीत कहाणी वाचते छोटी छोटी वाक्य लक्षात छानच राहतात. कांकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्यादासी दे '... उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको' 'दुसऱ्या मजलेस... अर्थ समजायचं वय नव्हतंच ते. पण 'निळ्या घोड्यावर बस... निळी वस्त्र परिधान कर... अशी वाक्य एक झकास कल्पनाचित्र रेखाटत असतं. 'नागकन्या देवकन्यांना रानात जाऊन वसा वसण्याची गरज काय' तेच कळत नसे.

शब्दांचे सुटे सुटे अर्थ लावण्याचं वय ओलांडलं आणि कहाण्यांचे शब्द किती निरर्थक आहेत ते बुद्धीला कळू लागलं. एकेका यत्तेेचे सोपानं चढत जाताना उमगलं की तर्काशी या कहाण्यांचा काहीच ताळमेळ नाही. आधुनिक संकल्पनांशी नाही. विज्ञानाशी तर नाहीच नाही. हरतालिकेच्या कहाणीत म्हटलंय... 'नक्षत्रात चंद श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्व व्रतांत श्रेष्ठ...' किंवा जिवतीच्या कहाणीत... 'बाई बाई तुला वरवंटा झाला...' नागपंचमीच्या कहाणीनं तर हद्द झाली... 'नागीण बाळंत होऊ लागली. हिला दिवा धरायला सांगितलं. दिव्यातलं तेल सांडून पिलांची शेपटं भाजली...' बस्स!! कहाण्याचं पुस्तक बासनात बांधून टाकलं.

वर्षामागून वर्ष उलटली. माझं लग्न झालं. पहिलं वर्ष नव्या नवलाईचं सणावारांचं. नटण्यासजण्याचं. व्रतकैकल्यांचं. कहाण्यांचं पुस्तक पुनश्च मिळवलं. कोणकोणती व्रतवैकल्य, कशी कशी करायची जरा रेफरन्सेस बघू!

पहिला श्रावणीसोमवार शिवामुठीचा. कहाणी वाचली. सासुसासरे, दीराभावा, नणंदाजावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा... तेव्हाच निश्चय केला शिवामूठ न वहाण्याचा. मी सासरच्यांची आवडती आहे म्हणूनच तर लग्न केलंय. नावडती असेनच तर माझ्या गुणांनी सर्वांना आपलंसं करेन, तेही मला आपलंसं करतील.

मंगळागौर जागवण्यात मी एक्सर्पट असले तरी पत्री जमवण्यातला, दांडी मारून पूजन करण्याचा उत्साह उतरलेला होता. दुसऱ्यांनी जोपासलेल्या झाडांची पत्री खुडणं हे माझ्यालेखी महापाप. विकतचा पाचोळा आणायचा नाही ते नक्की होतं तेव्ही रितीला देवी मंगळागौरीचं पूजन करायचं आणि रात्र खेळून दमछाक करून जागवायची हे ठरवलं. परंतु मंगळागौरीची कहाणी ही इतक्या विसंवादी घटनांची मालिका आहे, की आजच्या दूरदर्शनमालिका फिक्या पडली... 'पोटभर आंबे खाल्ले मोटभर घरी...' पुत्र मागितलास तर गुणी होईल, दीर्घायुषी मागितलास तर जन्मांध... मामाभाच्यांच्या काशीयात्रेची गोष्ट... गोऱ्या भुरक्या मुलीनं (नवरीनं) रात्री पतीला डंख करायला आलेल्या नागाला कऱ्यात कोंडलं. कऱ्याचं तोंड अंगच्या चोळीनं बांधून टाकलं.... पाहतो ते सकाळी त्यातून रत्नहार निघाला... दिवसेंदिवस माझी बेचैनी वाढतच गेली.

मनाला परतील झेपतील तेवढंच सणवार करूया नोकरीउद्योग सांभाळून, सासरचे सुशिक्षित आणि सूज्ञ होते. पुन्हा एकदा कहाण्यांचं पुस्तक बासनात गेलं.

माझी मुलं हळूहळू मोठी होत होती. रोजरोज गोष्ट तरी कोणती सांगायची? पुन्हा एकदा मोर्चा आपसूकच बालपणी पाठ झालेल्या कहाण्यांकडे वळला. मुलं ऐकून घेत, पण मध्येच थांबवत प्रश्न विचारत शंका विचारलं. त्यांच्या शंका अगदी बरोबर असं. आई, उदकाचे तळे म्हणजे अजून कसलं कसलं तळं असतं? उदक म्हणजे पाणी ना? पहिल्याच कहाणीच्या पहिल्याच शब्दावर अडखळले. सपशेल गटांगळ्या खाऊ लागले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं हळूहळू अशक्यच झालं. गरीब ब्राह्माण, नावडती, आवडती, दोन राण्या, औट घटकेचं माहेर, कुसुंबीच्या फुलासारखं सासर... साऱ्याच शब्दांवर ठेचा लागत गेल्या. बहुतेक सर्व कहाण्यात आटपाट नगरात एक गरीब ब्राह्माण असायचा नाहीतर राजा असायचा. फक्त एक दोन कहाण्यातच वाणी किंवा शेतकरी किंवा कुणबी. बरं मंगळागौरीची कहाणी घडते वाण्याच्या घरी पण वाण्यांत आज मंगळागौर पूजत नाहीत. हा कुळाचार फक्त ब्राह्माणात! कहाणी सांगण्याची एकूण लय बिघडलीच! या वेळी मात्र कहाण्याचं पुस्तक बासनान नाही गेलं.

या वेळपावेतो मी शब्दांच्यामधले संदर्भ वाचू लागले होते. प्रत्येक कहाणी ही प्रत्येक गरीब ब्राह्माणाची विवशता होती. राजाच्या राण्यांचीही विवशता होती मग सामान्य माणसाबद्दल काय विचारावं?

औट घटकेचं माहेर वेळूच्या बेटात मागणाऱ्या नावडत्या राणीची व्यथा समजी. गरीब माहेर असलेल्या लेकीसुनांना अजूनही एकविसाव्या, शतकातही उपेक्षा भोगव्या लागतात की! हुंडाबळी छळ दुसरं काय सांगतात?

खुलभर दुधांची गोष्ट ही आजच्या समाजाची व्यथा आहे. मला काय त्याचं दुसरं बघतील ही वृत्ती आजही आहेच. 'जिवतीच्या कहाणीत बाई बाई तुला वरंवटा झाला' असं त्या ब्राह्माणबाईला सुईण सांगते आणि एकीकडे मुलगा होत नसलेल्या राणीला सांगते, की 'तू गर्भारपणाचं डंभ कर मी नाळवारीसह मुलगा तुला आणून देईन.' आज तरी परिस्थिती कितपत सुधारल्येय? छे... हॉस्पिटलातून होणाऱ्या अर्भकांच्या चोऱ्या हीच कहाणी सांगतात. पुन्हा पुन्हा मुलगाच हवा ही धारणा आजही समाजात ठिय्या मांडून आहेच की!

शुक्रवारची देवीची कहाणी हे आजच्या समाजमनाचं रूप दाखवतात. 'बाबा हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं भोजन आहे...' असं सांगून बहिणीनं उद्दाम झालेल्या श्रीमंत भावाचे डोळे उघडले. आजच्या नवश्रीमंतीनं मातलेल्या लाखो भावाबहिणीचं डोळे कोण उघडणार?

कहाण्यात काही संदर्भ येतात धान्यधुन्याचे. शिवामुठीच्या कहाणीत बघाना एकेक सोमवारचं धान्य आहे. तांदुळ, तीळ, मूग, जव, सातू. आधुनिक विज्ञान या धान्यांची रोजच्या जेवणातली अपरिहार्यता सांगतं. पोषण मूल्यांनी समृद्ध असलेली ही पाचही धान्य आहेत. यात गहू सांगितलाय तो सालासकट-फोपटासरकट म्हणजे जव. फोलपटासहित जव घेतलं तरच ते ब जीवनसत्व समृद्ध असतं. केनीकुर्डुची भाजी तर पावसाळ्यात हटकून खावी. ही चविष्ट आणि खनिजसमृद्ध आहे. संपत शनिवारच्या गोष्टीत एक उल्लेख येतो, की स्नानाला गरम पाणी दिलं तेरड्याचंबी वाटून लावलं दुसऱ्या एका कहाणीत 'आंघोळीला ऊन पाणी आहे टाकळ्याची चोखणी आहे....' गावाकडे कोकणात चौकशी केल्यावर कळलं की टाकळ्याच्या बिया पाट्यावर पाल्यासह वाटायच्या त्यात खोबरं वाटायाचं आणि दिवाळीला उटण्याप्रमाणे लावून ठेवायं. वर ऊन पाण्यानं आंघोळ करायची. टाकळ्याच्या बियांना म्हणे सुगंध येतो. आयुवेर्दाच्या अभ्यासातून समजलं की कंड, दाद, खाज, खरका कुठल्याही त्वचाविकारासाठी टाकळ्याचं पंचांग वापरतात. बिया, चीक, मुळी फारच गुणकारी. जवळजवळ सर्वच कहाण्या दानाचं महत्त्व सांगतात. नित्यनेमांचं महत्त्व सांगतात. जनसामान्यांना आकळेल अशा सोप्या गद्यरचनात सांगतात. कहाण्या हे आहे एक लोकवाङ्मय त्याचा उगम तरी कुठे शोधायचा? पण मामा-भाचे, शंकरपार्वती, हिरेमोत्ये, रत्नहार, अप्सरा, देवलोक इंदलोकचंदलोक अशा भुलाव्यांनी नटवून कहाण्यांना अमर सुरस बनवलंय.

वाचनाचा नाद मी मुलांना लावलाय. हे लोकवाङ्मय मी मुलांपुढे ठेवलंय. मुलांनी वाटलं तर वाचावं. सकस ते वेचावं फोलपटं टाकून द्यावीत. तरीही आजही मला अनेक प्रश्नांची उत्तर मिळू शकत नाहीत तेव्हा उत्तरं न मिळालेल्या साठा उत्तरांची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

No comments: