Monday, October 29, 2007

ठाण्यात यंदाही इको फ्रेंडली विसर्जनाला प्राधान्य

ठाणे, ता. १४ - शहरातील तलावांमधील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या "इको फ्रेंडली गणेशमूर्ती विसर्जन' संकल्पनेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे यंदाही पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. .....
तसेच गणेशोत्सवापूर्वी महत्त्वाच्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी दिले.

महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी वागळे इस्टेट येथील रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, मासुंदा तलाव येथे कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मुंबईतील घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथील मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती लहान तलावात बुडविताना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन या मूर्तींना रेतीबंदर येथील घाटावर विसर्जनासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत रेतीबंदर येथे विसर्जनासाठी महाघाट तयार करण्यात आले आहेत. भरती आणि ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन हे घाट बांधण्यात आले आहेत. येथे वाहनतळ, अग्निशमन दल, पाणबुडी पथक, प्रखर विद्युत व्यवस्था आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

मुख्य अथवा कृत्रिम तलावात मोठ्या संख्येने गर्दी होऊ नये यासाठी यंदाही महापालिकेतर्फे गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांत स्वीकारलेल्या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाणार आहे. महापालिका कार्यालय पाचपाखाडी, राम मारुती रोड येथील मडवी हाऊस, वर्तकनगरमधील व्यंकटेश मंदिर, चिरंजीवी हॉस्पिटल, पोखरण रोड क्रमांक २ येथील वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर आदी ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारल्या जाणार आहेत.

No comments: