Tuesday, August 14, 2007

हौसेमौजेचं व्रत


हौसेमौजेचं व्रत

[ Monday, August 13, 2007 07:47:05 pm]

दिवसभर कामाच्या धबडग्यात राबणाऱ्या आणि सासुरवासाचे चटके निमूटपणे भोगणाऱ्या बायकांच्या वाट्याला वर्षातून एकदोनदा तरी सुखाचे काही शिडकावे यायचे. मंगळागौरीचं व्रत त्यातलंच एक. आता परिस्थिती बदललीये , या व्रताला हौसेमौजेचं स्वरुप आलंय.

मंगळागौरीचं व्रत समाजातल्या स्त्रियांचं सगळ्यात आवडीचं व्रत. मला खूपदा प्रश्न पडतो की आपण फुलांचा राजा , फळांचा राजा असे म्हणतो पण मग असेच जर महिन्यांचा राजा म्हणायचा झालाच तर कोणता महिना निवडला जाईल ? याचं उत्तर मला तरी श्रावण महिनाच वाटतं.

'' श्रावणमासी हर्ष मानसी '' ही कविता मनातल्या मनात जरी म्हटली तरी श्रावणातले सण , व्रतं त्या वेळी घरोघरी होणारी धांदल , गोड धोड पदार्थांचे सुवास आणि मोगरा , सोनचाफा , पारिजातका सारख्या सुगंधी फुलांनी आसमंतात भरून राहणारे ते भारावलेपण या सगळ्या आठवणींनी मन भरून येते. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी काहीना काही असतेच म्हणजे आता बघा हं श्रावण सोमवार , संपत शनिवार , जिवतीचा शुक्रवार त्यातच येणारी नागपंचमी , राखी पौणिर्मा यासारखे सण म्हणजे सगळ्या आनंदी वातावरणाची अगदी रेलचेलच. मग यांतलं सगळ्यात उत्साहाने केलं जाणारं आणखी एक व्रत म्हणजे मंगळागौर.

मंगळागौर म्हटलं अलगदपणे लहानपणीच्या आठवणीत जायला होते. त्या वेळी मंगळागौर म्हणजे रात्रभर वेगवेगळ्या खेळांचा धिंगाणा एवढाच अर्थ होता. त्या वेळी शेजारी पाजारी लग्नं झाली की कुणाकडे केव्हा मंगळागौर आहे. आणि आम्हा खेळायला बोलावणार की नाही यामध्येच आम्हाला जास्त रस असायचा.

अगदी दुसऱ्या दिवशी शाळा असली तरी रात्रभर खेळायचं आणि सकाळी न झोपताही शाळेत जायचच शिवाय असा उपक्रम एखाद्याच मंगळवारचा नसायचा तर श्रावण महिन्यातले चारही मंगळवार अशीच धम्माल चालायची. मंगळागौर कुणाकडेही असो ते पत्री जमवणं , प्राजक्ताची टोपली टोपली फुलं वेचणं म्हणजे अगदी वेगळ्याच जगात वावरण्याचा अनोखा अनुभवच असायचा असा हा अनुभव आजही घ्यायला आवडेल इतका तो मनात रूतून बसलेला आहे.

आता मंगळागौरीच व्रत म्हणजे काय ? ते कुणी करायचे ? कशासाठी करायचे ? म्हणजे मंगळागौरीच व्रत नवीन लग्न झालेल्या मुलींनी करायचं असतं. श्रावण महिन्यातल्या चारी मंगळवारी देवी अन्नपूणेर्च्या मूतीर्ची पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वषीर् माहेरी आणि सासरी एक एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. त्या वेळी अन्नपूणेर्ची मूतीर् घेऊन पंचामृती शास्त्रोक्त विधीवत पूजा केली जाते. ही पूजा करताना सुगंधी फुलांसोबत वेगवेगळी पत्री आणली जाते

यामध्ये जाई , जुई , मोगरा , गुलाब अशा फुलझाडांची पाने घेतली जातात. शिवाय ही पूजा करताना त्या देवीला एखाद्या स्त्री सारखे शृंगारले जाते म्हणजे उष्णोदकाने स्नान घालतात , अत्तर लावतात , काजळ घातले जाते आणि दागिने घालूनही शृंगारले जाते. हे दागिने धातू किंवा मोती मण्यांचे नसतात तर कणिक (गव्हाचे पीठ) हळद तेल घालून घट्ट भिजवून त्यापासून दागिने बनवले जाते यामध्ये मंगळसूत्र , खटवी , वेणी कर्णफुले अशा सगळ्या दागिन्यांचा समावेश असतो.

पूजा झाल्या नंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. आणि गोडधोडाच्या पानाचा नैवेद्य देवीला दाखवून घरातील आणि इतर नातेवाईक मंगळीसह दुपारचे भोजन केले जाते. पूजा करण्यासाठी घरातल्या मुली किंवा सूनेसोबत नात्यातल्या किंवा ओळखीतल्या नव विवाहीत मुलींना बोलावतात. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं.

दुपारपर्यंत हा कार्यक्रम झाला की देवीच्या पूजेच्या चौरंगावर वेगवेगळी सुशोभित मांडणी केली जाते. यासाठी खूप सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरण्याची पद्धत आहे. त्यानंतर या देवीचे जाग्रण करण्यासाठी इतर सुवासिनी , मुली , बायकांना आमंत्रित करतात. रात्री जेवत नाहीत परंतु फराळ करतात. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. यासाठी ठराविक पदार्थ केले जातात. यामध्ये भाजणीचे वडे किंवा थालीपीठ दही , चटणी आणि भाजक्या तांदुळाचा भात म्हणजे मूगडाळीची खिचडी , सार किंवा अळूची पातळ भाजी , डाळींब्याची उसळ किंवा मटकीची उसळ करण्याची पद्धत आहे.

फराळ झाल्यानंतर देवीची आरती करतात. या आरतीला ताटात निरांजन घेतात. आरती झाल्यानंतर ज्यांनी पूजा केली आहे , त्या सुहासिनींनी आपल्या पतीचे नाव काव्यमय उखाण्यात घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या , झिम्मा , पिंगा , बसफुगडी , टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणं असे खेळ खेळतात. यासाठी पारंपरिक गाणी म्हटली जातात. या गाण्यांमध्ये गणेशस्तवन , कृष्णाच्या विविध लीला असतात. शिवाय अनेक गाण्यांमधून माहेराचे मनोहारी असे वर्णन असते. तर सासर आणि सासरच्या लोकांना वाईट म्हणून दुषणे दिलेली असतात. वेगवेगळ्या खेळांमध्ये सवती-सवतींचे भांडणं , सासवा-सूनांचा लंपडावासारखा खेळ , जातं घालणं , पाणी लाटणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचा समावेश असतो.

हे व्रत लग्न झाल्यापासून पहिली पाच वर्षं करतात. पाचव्या वषीर् शेवटच्या मंगळवारी (श्रावणतल्याच) त्यांचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या वेळी होमहवन करून आई वडिलांना वाण दिलं जाते यामध्ये मुलीने आईला सापाची मूतीर् देण्याची पद्धत आहे. ही मूतीर् चांदी सोने आपल्या ऐपती प्रमाणे देतात. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे. व्रत पतीला दीर्घायुष्य लाभावे या हेतूने केले जाते.

या व्रताचा सांस्कृतिक अर्थ घ्यायचा झाला तर आषाढात कोसळणारा पाऊस श्रावणात कमी झालेला असतो. शेतीचीही कामे कमी असतात. अशा वेळी घरातल्या स्त्रियांना एकमेकींकडे जायला , स्वत:च खेळून थोडी मजा करायला वेळ असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात हे व्रत करण्याची पद्धत असावी. या व्रताच्या कहाणीनुसार ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांच्या घरात कुणी बालविधवा होत नाही आणि या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी जन्मलेला असतो व त्याला दंश करण्यास साप येतो. पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केले असल्याने त्या सर्पाशी मंगळागौर द्वंद्व करते आणि त्या सर्पाचं सोन्याच्या हारात रुपांतर होतं. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर (काळेमणी आणि सोन्याचामणी) जोडवी , कूंकू , कंगवा आरसा असे दिले जाते.

आज सगळं आयुष्य धावपळीचं झालंय , पण मंगळागौरीचं व्रत मात्र आपली लोकप्रियता टिकवून आहे. आजही तेवढ्याच उत्साहाने हे व्रत घरोघरी केलं जातं.

- शैला गोखले



2 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख बॉग

माझी दुनिया said...

धन्यवाद ! हरेकॄष्णाजी.