Friday, October 12, 2007

श्री क्षेत्र तुळजापूर

[ Friday, October 12, 2007 05:30:18 am]



कृतयुगात ऋषीपत्नी अनुभूतीने भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्री तुळजाभवानी माता धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजादेवी होय. मातेने येथे कायम वास्तव्य केले म्हणून हे तुळजापूर होय.

........

भारतातील शक्तिदेवतेच्या एकशेआठ पीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात असून, श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ आहे. चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर शहराच्या उत्तरेस ४४ किलोमीटर अंतरावर वसलेले तुळजापूर छोटेखानी शहर आहे. बालाघाट डोंगराची रांग तुळजापूर येथे संपते. शहरात येण्यापूवीर् लागणाऱ्या घाटरस्त्यावर घाटशीळा मंदिर आहे.

श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य मंदिर हे शहराच्या पश्चिम भागात एका खोल दरीत आहे. मंदिरात जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा संपताच कल्लोळ तीर्थ, दुसरा टप्पा संपल्यावर गोमुख तीर्थ व तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात येतो. समोर भवानी मातेची होम शाळा असून, त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य देवालय आहे. सोळा भव्य दगडी खांब असून, गाभाऱ्यात श्ाी तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख मूतीर् चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे.

कृतयुगात ऋषीपत्नी अनुभूतीने भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्री तुळजाभवानी माता धावून आली व तिचे रक्षण करून तिला वर दिला. हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजादेवी होय. मातेने येथे कायम वास्तव्य केले म्हणून हे तुळजापूर होय.

श्री तुळजाभवानी मातेची रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते व महावस्त्र नेसवून विविध अलंकार घातले जातात. जामदारखाना समृद्ध असून त्यात सोन्याचे विविध रत्नजडीत मुकुट, विविध अलंकार, नवरत्नांचे हार, मोहनमाळ आणि पुतळीहार आहेत. छत्रपति श्ाी शिवाजी महाराजांनी आपल्या या कुलदेवतेला अर्पण केलेल्या माळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत. आजतागायत कोल्हापूरच्या येथील करवीर संस्थानमार्फत मातेची नित्य दोन्ही वेळेस पूजा केली जाते.

नवरात्र सणासारखेच साजरे होते. दसऱ्याचे शिलंगण खेळण्यास श्री तुळजाभवानी मातेची मूळ मूर्ती मंदिरा बाहेर येते. यावेळी सिंहासन रिकामेच असते. या दिवशी मातेस १०८ साड्या नेसविल्या जातात. पुजारी मंडळी ही मूर्ती हातावरून बाहेर आणून नगर जिल्ह््यातील भिंगारहून दरवर्षी नव्या बनविलेल्या आणि पायी चालत आणणाऱ्या पालखीत आणून ठेवतात. नवमीच्या दिवशी रात्री शहरातून याची भव्य मिरवणूक निघते व उत्तररात्री ती मंदिरात येते. याच पालखीतून माता आपल्याच मंदिराला प्रदक्षिणा घालते व पलंगावर श्रमनिद्रा घेते. सारा मंदिर परिसर भक्तांनी खचाखच भरलेला असतो. मातेचा उदोउदो होतो. लक्ष लक्ष हातांनी सौभाग्यलेणे असलेल्या कुंकवाची मुक्त उधळण सुरू असल्याने सारा परिसरच लालभडक बनून जातो. हा दिव्य सोहळा अनुभवताना देहभान हरपून जाते.

- के. एन. रुईकर

No comments: