Monday, October 29, 2007

अंबेजोगाई योगेश्वरी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांशिवाय इतर काही प्रसिद्ध अशी आदिमायेची शक्तीस्थानं आहेत. त्यापैकी 'अंबेजोगाई' या ठिकाणाचे अंबेजोगाई योगेश्वरीचे मंदिर होय. बीड जिल्ह्यात हे क्षेत्र वसले आहे. परभणी किंवा नांदेडला उतरून एस.. टी., सुमो आदि वाहनांनी तुम्ही 'अंबेजोगाई' या तालुक्यात पोचू शकता.

अंबेजोगाई येथील देवीचे नाव आहे योगेश्वरी. या देवीच्या स्थानासंदर्भात काही आख्यायिका आहेत. देतासूर नामक दैत्याचा वध करण्यासाठी देवीने घेतलेला अवतार म्हणजे योगेश्वरीचा अवतार असे कोणी म्हणतात. योगेश्वरी हा पार्वतीचाच अवतार समजला जातो! अंबेजोगाई' येथील ग्रामस्थांची ही ग्रामदेवता आहे.

ही देवी कुमारिका आहे व देवीचा अवतार कुमारिकेचा का, याची देखील आख्यायिका सांगितली जाते. पार्वतीने 'त्रिपुरसुंदरी' नामक अवतार घेतला व तिचा परळी येथील वैजनाथ (बैद्यनाथ) यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. पण त्रिपुरसुंदरीला कुमारिकाच रहायचे होते. लग्नाच्या निमित्ताने त्रिपुरसुंदरी आणि सर्व वऱ्हाड 'परळी' गावाजवळ असणाऱ्या 'अंबेजोगाई' येथील शिवलेण्यात वास्तव्याला आले. विवाहमुहूर्ताच्या वेळी 'त्रिपुरसुंदरी' आपल्या जागेवरच बसून राहिली. तिने ठामपणे विवाहास नकार दिला. लग्नाच्या कारणाने कोकणातील मूळ देवता 'अंबेजोगाई' येथे आली व तेथेच राहिली, असेही या संदर्भात सांगितले जाते.

खरं तर मार्गशीर्ष शुद्ध पौणिर्मा हा देवीचा जन्मदिवस. त्यामुळे अंबेजोगाई येथील मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौणिर्मा असा नवरात्रौत्सव साजरा करतात. पण योगेश्वरी हा देवीचा अवतार म्हणजेच देवीचे रूप असल्याने शारदीय नवरात्रही येथे थाटामाटात साजरे करतात.

देवीच्या हातात शस्त्रायुद्धांबरोबरच परडीही आहे. शारदीय नवरात्रात काकड आरती, दुपारचा नैवैद्य आणि मुख्य म्हणजे देवीला प्रसाद म्हणून तांबूल (विडा) देण्याची पद्धतही येथे आहे. शारदीय नवरात्रात अष्टमीला शतचंडी हवन करण्याची प्रथा असून, नवमीला पूर्णाहूती असते. दसऱ्याला 'अंबेजोगाई' मंदिरातील जी मूतीर् 'उत्सवमूतीर्' म्हणून असते, तिची पालखीतून गावभर मिरवणूक काढली जाते. यावेळी गोंधळी व आराधी बायका यांची उपस्थिती असते. जोगवा मागितला जातो. रात्री मिरवणूक पुन्हा देवळात परतल्यावर प्रसादाचे वाटप होते. मार्गशीर्षातील नवरात्रोत्सवातही पौणिर्मेला अशी उत्सवमूतीर्ची पालखीतून मिरवणूक काढली जाते. कारण तो देवीचा जन्मोत्सव असतो. त्या उत्सवातही शतचंडी हवन केले जाते.

योगेश्वरीची मूतीर् शेंदरी रंगाची असून तिचे रूप उग्र आहे. अष्टमी आणि दसऱ्याला देवीला सर्व दागिन्यांनी सुशोभित केले जातं. नवरात्रात रोज साधारणपणे दहा हजार लोक देवीच्या दर्शनाला येतात. अंबेजोगाई येथे काही हॉटेल्स आहेत. त्यापैकी 'कृष्णाई' हॉटेल मुक्काम व जेवणखाणासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे वाड्यामध्ये जे गुरुजी वास्तव्य करतात, त्यांच्याशी संपर्क साधता अभिषेक- पूजा याची सोय होऊ शकते. मात्र गाभाऱ्यात बसून पूजा करताना पुरुषाने सोवळे (कद) नेसणे अनिवार्य असते.

' थोरली जाऊ' चित्रपटातील 'आदिमाया अंबाबाई' हे सुधीर मोघे यांचं गीत कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई अशा तीर्थक्षेत्री चित्रीत झालंय. त्यात अंबेजोगाईचं वर्णन करताना म्हटलंय.

'' अमरावतीची देवता शाश्वत अमर

अंबेजोगाईत तिने मांडीयले घर

मुंबापुरीच्या गदीर्ला दान चैतन्याचे देई'' खरोखरच मुंबईकरांना आणि कोकणवासियांना कोकणस्थांची कुलदेवता असणारी अंबेजोगाई चैतन्याची प्रेरणा देते.

- गणेश आचवल

No comments: