Monday, October 29, 2007

रूप गणेशाचे

।। रूप ॐकार साकाराचे ।।

तू तो ॐकार साकार अखिल विश्वाचा आधार।
मूलतत्त्व निराकार तो ही तूचिं गणेशा ।।

श्री गणरायाचं हे सार्थ वर्णन.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि , असा ज्याचा उल्लेख केला गेलाय , म्हणजेच ज्यानं अवघं विश्व व्यापून टाकलंय असा हा श्रीगणेश.. पण तरीही हा गणपतीबाप्पा आपल्याला आपल्यातलाच एक वाटतो.. त्याचं साजिरं रूप तर आपल्याला भलतंच भावतं.. वक्रतुंड , महाकाय , शूर्पकर्ण , गजानन , एकदंत , लंबोदर , अशी अनेक नावं या गणेशानं धारण केली आहेत. पण त्याचं हे रूप प्रतिकात्मक आहे , ती आहे प्रतिकांची देवता.. नेता आणि तत्त्ववेत्त्याचे गुण तो आपल्या रुपातून सांगतो , ते असेः
श्री गणपतीचं शीर हत्तीचं कसं , याबद्दलची पौराणिक कथा आपण सारेच जाणतो. अजाणतेपणी गणपतीचं शीर भगवान शंकराने कापून टाकले आणि नंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी त्यांनी पार्षदाला शीर शोधून आणण्यास पाठविले. तेव्हा तो हत्तीचं मस्तक घेऊन आला आणि ते गणेशाच्या धडावर ठेवण्यात आले आणि गणपती झाला गजानन. ही कथा भावगर्भित आहे. भगवान शंकर जर आपल्या मुलाला हत्तीचे मस्तक बसवू शकतो तर गणेशाचे स्वतःचेच मस्तक का नाही , हा प्रश्न स्वाभाविकच प्रत्येकाच्या मनात येतो. पण , पुराणकथा इतक्या साध्या नसतात. या कथेचा गर्भितार्थ असा की , गणपती ही तत्त्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्त्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ हत्तीचेच मस्तक असले पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्त्ववेत्ता किंवा लोकप्रिय नेता बनू शकत नाही.
गण-पती म्हणजेच समूहाचा पती , अर्थात नेता. तो गुण-पतीही आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्याकडे बाह्य सौंदर्य नसले तरी आंतरिक सौंदर्याचे अमाप वैभव असले पाहिजे , हेही श्रीगणेशाच्या रुपातून प्रतीत होते. तसेच , हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये हुशार मानला जातो आणि नेता निर्बुद्ध असून कसे चालेल , म्हणून गणपती गजानन.
या गजाननाचे कान सुपासारखे कशासाठी , तर नेत्याने सर्वांचे बोलणे ऐकून घ्यावे. पण त्यातले सार ग्रहण करून तत्त्व नसलेल्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात , हे मार्गदर्शन त्यात आहे. हे मोठे कान उत्तम श्रवणभक्तीचेही दिग्दर्शन आहे
गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे , आयुष्यात सूक्ष्म-दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात , तसेच ते दूरदृष्टीदेखील सुचवितात. हत्ती व्यक्तीचे भविष्य वाचू शकतो , असेही आपल्याकडे मानले जाते. म्हणूनच , जुन्या काळात कुण्या बेवारस राजाचे निधन झाले तर हत्तीणीच्या सोंडेत माळ देत व ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राजा बनवत असत. हत्तीचे लांब नाक अर्थात सोंडही त्याचेच प्रतीक आहे. भविष्यात घडणा-या गोष्टींचा गंध नेत्याला प्रथम आला पाहिजे , असे ही सोंड सुचवते.
श्री गणेशाचे दोन सुळे.. एक पूर्ण आणि दुसरा अर्धा. त्यातला पूर्ण सुळा श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धीचा आहे. त्याचा अर्थ असा की , जीवन विकासासाठी स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. भले विद्वत्ता काहीशी कमी असेल तरी चालेल !
गणपतीच्या चार हातांपैकी एका हातात अंकुश , दुस-या हातात पाश , तिस-या हातात मोदक आहे आणि चौथ्या हाताने तो आशीर्वाद देतोय. त्यापैकी अंकुश वासना-विकारांवर संयमाची गरज असल्याचे सुचवितो , तर गरज पडताच इंद्रीयांना किंवा अनुयायांना शिक्षा करण्याचे सामर्थ्यही तत्त्ववेत्ता आणि नेत्यामध्ये असायला हवे , असे पाश सुचित करतो. मोदकाचेही दोन-तीन अर्थ आहेत. ज्याच्यामुळे आनंद होतो असा सात्विक आहार महापुरुषांचा असावा. म्हणजेच इंद्रियांचा आहार सात्त्विक असला पाहिजे. शिवाय मोदक हे तत्त्वज्ञानाचेही प्रतीक आहे. मोदकाच्या पापुद्र्याप्रमाणे तत्त्वज्ञानही वरवर चाखणा-यांना फिकेच वाटते. परंतु आतील सारभाग मधुर असतो. आणि जे कर्माचा फळरुपी मोदक देवाच्या हातात ठेवतात त्यांना तो आशीर्वाद देतो.

गणपतीबाप्पाला लंबोदर म्हणतात. कारण , सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवण्याची सूचना तो करतो. गणरायाचे पाय लहान आहेत. त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. यातून तो असे सुचवितो की , कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. तसेच तोकडे पाय हे बुद्घिवंताचेही मानले जाते.
सुखकर्त्या आणि विघ्नहर्त्या गणेशाचे वाहन उंदीर आहे. गरूड , नंदी या विशाल वाहनांऐवजी गणपतीने उंदराला आपले वाहन केले कारण , तो सर्व भक्तांच्या घरात प्रवेश करू इच्छितो. हा उदार दृष्टिकोन प्रत्येक नेत्याने ठेवायला हवा. तसेच उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे. आणि या मायेवर फक्त ज्ञानी माणूसच अंकुश ठेवू शकतो , तिच्यावर स्वार होऊ शकतो.
गणपतीला वक्रतुण्ड म्हणतात. म्हणजे ऋद्धिसिद्धिपासून मुख फिरवून राहणा-यालाच ऋद्धिसिद्धि मिळतात. वाकडे-तिकडे चालणा-याला , आडव्या रस्त्याला जाणा-याला जो दंड देतो तो वक्रतुण्ड.
नेता आणि तत्त्ववेत्ता कसा असावा , हे गणपती आपल्या आवडीनिवडीतूनही दाखवितो. त्याला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही , असे गवत त्याने स्वतःचे मानले आणि त्याचे महत्त्व वाढविले. नेत्याने आणि तत्त्ववेत्त्यानेही अशाच दुर्लक्षितांना आपले मानले पाहिजे. गणपतीला लाल फुल आवडते. कारण लाल रंग क्रांतीचा आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्यालाही क्रांती प्रिय असायला हवी , असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे.
म्हणूनच या गणरायाचं वर्णन ॐकार असं केलं जातं.
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ।।

- संस्कृति पूजन या संग्रहातून साभार

No comments: