Tuesday, August 28, 2007

गुळसुंद्याच्या सिद्धेश्वर - स्वयंभू आविष्कार

- अविनाश चंदने
आजूबाजूला हिरवीगार झाडेझुडपं , डोंगराळ परिसर , जवळूनच दुथडी भरून वाहणारी पाताळगंगा नदी , मध्येच श्रावणातील पाऊस अशा वातावरणात किनाऱ्यावरील सिद्धेश्वर देवस्थानात पाय ठेवताच मन प्रसन्न होतं. पनवेल तालुक्यातील गुळसंुदे गावातील सिद्धेश्वर देवस्थान किमान ७५० ते ८०० वषेर् जुनं असून स्वयंभू आहे. त्यामुळे श्रावणात आजूबाजूच्या ३०-३५ गावांतील भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ लागते.

रसायनी परिसरातील गुळसुंदे गावाला बाजूनं हिरव्याकंच डोंगरांची तटबंदी आहे. बाजूलाच असलेला कर्नाळा तसेच माणिके गड किल्ले त्याची साक्ष देतात. अशा निसर्गरम्य गावात साक्षात सिद्धेश्वर प्रगट न झाल्यास आश्चर्य. असं हे अंदाजे ८०० वषेर् जुनं मंदिर कोणी बांधलं याची निश्चित माहिती ग्रामस्थांकडे नाही. मात्र , मंदिराचा सभामंडप पेशव्यांचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी बांधल्याचं सांगितलं जातं. पुढे गावातील गणपतराव भिडे यांच्या नावावर जमीन करून पेशव्यांनी मंदिरातील पूजाअर्चाची व्यवस्था केली.

सिद्धेश्वर मंदिर आणि पाताळगंगा नदी यांच्यामध्ये सुंदर दीपमाळा आहे. ही १७२६ मध्ये बाजी महादेव करमरकर यांनी बांधली. आज या मंदिराच्या परिसरात श्री राम , मारूती , गोपाळकृष्ण (लक्ष्मीनारायण) , दुर्गादेवी (ग्रामदेवता) यांची मंदिरे आहेत. विशेष म्हणजे गुरुवर्य ह. भ. प. वै. बाळाराम महाराज कांबेकर यांनी सुरू केलेला श्रावणातील अखंड हरिनाम सप्ताह आजही तेवढ्याच भक्तीभावाने आणि उत्साहानं साजरा केला जातो. यंदा या सप्ताहाचं ५०वे वर्ष होतं.

श्रावण सुरू झाला की लगेचच सप्ताहाला सुरुवात होते ती अगदी अष्टमीपर्यंत. ही या गावची १९५८ पासून सुरू झालेली परंपरा आहे. यात जवळपासच्या २८ गावांतील ग्रामस्थ सहभागी होतात. सप्ताहाची सुरुवात पहाटे चार वाजता होते व रात्री आठ वाजता दिनक्रम संपतो. तरीही दिवसभरात ८०० ते हजार लोक यात सहभागी होतात.

मंदिर जुने असल्यामुळे जिणोर्द्दाराचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी देवस्थान ८०० वषेर् जुने वाटत नाही. मात्र , शंकराची पिंड आणि समोर नंदी पाहिला की त्यांचे ऐतिहासिक महत्व जाणवते. श्रावणात विशेषता सोमवारी हजारो भाविक सिद्धेश्वराच्या दर्शनाला येतात आणि ग्रामस्थ , देवस्थानाचे ट्रस्टी तसेच भाविक सर्वांचेच आनंदाने स्वागत करतात.

No comments: